नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना छातीत दुखत असल्याने शुक्रवारी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी छातीचा संसर्ग झाल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना थेट आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ९८ वर्षीय अडवाणी यांना शुक्रवारी सायंकाळी ७:३०च्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले.
अपोलो रुग्णालयाने एक हेल्थ बुलेटिन जारी करून सांगितले की, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना छातीत संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या माहितीनुसार, ते सध्या आयसीयूमध्ये असून न्यूरोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवून आहे.
पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी घेतली भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात दाखल होण्याच्या सुमारे आठवडाभरापूर्वी, ७ ऑक्टोबरला नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली होती. यावेळी मोदींनी २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अडवाणी यांचे आशीर्वाद घेतले. माजी उपपंतप्रधान अडवाणी यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली होती. त्यांनी म्हटले होते की, अडवाणींच्या दशकांच्या सार्वजनिक सेवेने आणि राष्ट्रजीवनातील त्यांच्या योगदानाने त्यांच्यावर खोलवर प्रभाव टाकला आहे. पंतप्रधान मोदींनी देशाची प्रगती मजबूत करण्यात अडवाणींच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचाही उल्लेख केला होता.
अडवाणी भाजपचे अनेकवेळा अध्यक्ष
लालकृष्ण अडवाणी यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. त्यांनी अनेक वेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि २००२ ते २००४ या काळात देशाचे उपपंतप्रधान म्हणून काम पाहिले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री यांसारखी महत्त्वाची पदेही भूषवली. भाजपला एक प्रमुख राष्ट्रीय पक्ष बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अडवाणी चार वेळा राज्यसभेचे आणि सात वेळा लोकसभेचे सदस्य होते.